Tuesday, November 27, 2007

life-dhada

मी माझ्या कार्यालयात शिरत होतो आणि निसर्ग मला एक आगळाच धडा देऊन गेला. मी कार्यालयाचं मोठं दार उघडलं आणि एक फुलपाखरू भिरभिरत आत शिरलं. ......त्याला दुसऱ्या बाजूनं बाहेर पडायला वाट नव्हती, म्हणून मी दरवाजाची फट आणखी रुंद करीत तो पूर्ण उघडला. पण, त्या तेवढ्याश्‍या हालचालीनंही ते आणखी कावरंबावरं झालं आणि शेजारच्या काचेवर जाऊन धडकलं. आपण आणि झाडं यांच्या दरम्यान अशी कोणती अदृष्य भिंत उभी ठाकली आहे, हे बहुदा त्या बिचाऱ्याला कळत नसावं. मला त्याची धडपड उमगली आणि त्याला मदत करण्यासाठी मी शेजारची आणखी दोन दारंही सताड उघडली. पण, त्यानं ते आणखी बुजलं. जरा आणखी वर उडालं आणि अकारण कोळ्याच्या जाळ्यात अडकलं. त्याला तिथून सुटणं सोपं जावं म्हणून मी लांब दांड्याची केरसुणी उंचावून कोळिष्टकं बाजूला केली. पण, आता त्याची धडपड अधिकच तीव्र झाली. ते जोरजोरानं खिडकीच्या काचेवर धडका देऊ लागलं. त्याच्या दृष्टीनं सुटकेचा तोच एकमेव मार्ग होता. पण, वास्तविक ते स्वतःची शक्ती वाया घालवीत होतं. निव्वळ एकच एक दिशा धरून चालल्यानं त्याला सुटकेचा मार्ग सापडेनासा झाला होता. ते स्वतःच्याच विचारांच्या, कल्पनांच्या आवर्तात बंदी बनून गेलं होतं. आपलं ही होतं का कधी असं?

1 comment:

Vijaykumar said...

हे नेहमी असच असतं,
जसं दिसतं तसं नसतं
आपलं आपल्याच मनात असतं,
कुणाच वाईट, कुणाच चांगलं असतं