Thursday, November 29, 2007

जमलंच नाही !

जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं...रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,
वाळूत बंगला बांधता बांधता..आलं असतं मनातलं सांगता..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं..कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,
कधी खोडी काढली असती..आणखी गोडी वाढली असती..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं...तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,
सूर कदाचित जुळले असते..तिला मनातले कळले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं...
निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,
माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..तिचे मात्र दवासारखे जपले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

Tuesday, November 27, 2007

माणुसकी

स्वतः एवढा जायबंदी असूनही, दुसऱ्याला मदत करण्याची त्याची तत्परता पाहून मी मनोमन खजील झालो. मनात विचार आला, मी तर एवढा धडधाकट आहे; पण मी खरोखरच अशा प्रकारची मदत केली असती का? मी किती "कोता' आहे, याची मला जाणीव झाली. माझी मानसिकता संपूर्ण बदलली. "माणुसकी' हाच खरा धर्म आहे व आहे त्या परिस्थितीतून जीवनातून आनंद शोधण्याची व जगण्यात जीवनाची सार्थकता आणि मर्म आहे. कोतेपणाचं जीवन जगण्यात अर्थ नसतो, हे मला त्या क्षणी उमगलं. .......

meech ka

आर्थर ऍश, एक नावाजलेला विम्बल्डन खेळाडू मृत्युशय्येवर पडलेला होता. १९८३ मध्ये हृदयावरील शस्त्रक्रियेच्या वेळी दिलेल्या रक्तामुळे त्याला एडस्‌ झाला होता. जगभरातून त्याच्या चाहत्यांची पत्रं त्याला येत होती. अशाच एका पत्रात लिहिलं होतं - ....""अशा वाईट रोगासाठी तुझीच निवड करावी असं देवाला का वाटलं?'' या पत्राला उत्तर देताना ऍशने लिहिलं - जगभरात पाच कोटी मुलं टेनिस खेळायला सुरुवात करतात. त्यातली ५० लाख टेनिस खेळायला शिकतात. त्यातल्या पाच लाखांना व्यावसायिक टेनिसपटू बनता येतं. त्यातल्या पन्नास हजारांना सर्किटमध्ये प्रवेश मिळतो. त्यातली पाच हजार ग्रॅन्ड स्लॅमपर्यंत पोचतात. त्यातली पन्नासच विम्बल्डनचा टप्पा गाठू शकतात. त्यातले चार सेमीफायनलपर्यंत पोचतात. दोघांना अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. आणि अशा साऱ्या प्रक्रियेतून जाऊन मी जेव्हा विजेतेपदाचे तबक उंचावून दाखवित होतो तेव्हा, ""मीच का?'' असा विचार तरी माझ्या मनाला शिवला होता का? मग आता तरी मी का विचारू, ""मीच का?''

life-dhada

मी माझ्या कार्यालयात शिरत होतो आणि निसर्ग मला एक आगळाच धडा देऊन गेला. मी कार्यालयाचं मोठं दार उघडलं आणि एक फुलपाखरू भिरभिरत आत शिरलं. ......त्याला दुसऱ्या बाजूनं बाहेर पडायला वाट नव्हती, म्हणून मी दरवाजाची फट आणखी रुंद करीत तो पूर्ण उघडला. पण, त्या तेवढ्याश्‍या हालचालीनंही ते आणखी कावरंबावरं झालं आणि शेजारच्या काचेवर जाऊन धडकलं. आपण आणि झाडं यांच्या दरम्यान अशी कोणती अदृष्य भिंत उभी ठाकली आहे, हे बहुदा त्या बिचाऱ्याला कळत नसावं. मला त्याची धडपड उमगली आणि त्याला मदत करण्यासाठी मी शेजारची आणखी दोन दारंही सताड उघडली. पण, त्यानं ते आणखी बुजलं. जरा आणखी वर उडालं आणि अकारण कोळ्याच्या जाळ्यात अडकलं. त्याला तिथून सुटणं सोपं जावं म्हणून मी लांब दांड्याची केरसुणी उंचावून कोळिष्टकं बाजूला केली. पण, आता त्याची धडपड अधिकच तीव्र झाली. ते जोरजोरानं खिडकीच्या काचेवर धडका देऊ लागलं. त्याच्या दृष्टीनं सुटकेचा तोच एकमेव मार्ग होता. पण, वास्तविक ते स्वतःची शक्ती वाया घालवीत होतं. निव्वळ एकच एक दिशा धरून चालल्यानं त्याला सुटकेचा मार्ग सापडेनासा झाला होता. ते स्वतःच्याच विचारांच्या, कल्पनांच्या आवर्तात बंदी बनून गेलं होतं. आपलं ही होतं का कधी असं?